पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे.
लांडगे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी आली. पुणे जिल्ह्यातील एक प्रखर राष्ट्राभिमानी नेता आपण गमावला. माझ्या राजकीय जीवनात बापट साहेबांनी कायम ताकद दिली. २०१४ ते २०१९ या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने माझ्या राजकीय वाटचालीतील गुरूतुल्य मार्गदर्शक हरपला आहे.
‘मी पुण्यात कुस्तीचे प्रशिक्षण घेत होतो. त्यावेळीपासून बापट साहेबांचे नेतृत्व मी अनुभवत आहे. अत्यंत स्थितप्रज्ञ असलेल्या या नेत्याने पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.
‘राष्ट्र प्रथम…नंतर पक्ष आणि शेवटी मी’ या विचाराने आयुष्यभर राष्ट्रनिष्ठा व पक्षनिष्ठा जोपासणारे बापटसाहेब कायम स्मरणात राहतील. तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने स्वर्गीय खासदार गिरीश बापट साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बापट कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही आमदार लांडगे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.