मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने (NCB) अटक केली होती. त्यावेळी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खान व त्याच्या मित्राला अटक केली होती. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यावर आता वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी मोठं विधान केलं आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली होती. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. आता आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, फायनल डिल 18 कोटींवर झाल्याची माहिती सीबीआयने तक्रारीत दिली आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. असे असताना क्रांती रेडकर यांनी यावर विधान केलं आहे. ‘माझे पती समीर वानखेडे यांना फसवले जात आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत हे सर्वांना माहीत आहे. तरीही त्यांना फसवले जात आहे. याप्रकरणी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करत आहोत’, असे क्रांती रेडकर म्हणाली.
काय आहे प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा येथे होता. ड्रग्ज प्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर समीर वानखेडेंची चौकशी करण्यात आली होती.