नागपूर : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा भंडाऱ्यात खून (Murder in Bhandara) करण्यात आला. या प्रकरणात भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Two Peoples Arrested in Murder Case) केली आहे. मोहम्मद तनवीर अब्दुल रज्जाक (वय 24 रा. मुदलियार चौक, शांतीनगर) असे मृताचे नाव आहे. तो गेल्या 7 एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी अतिक लतीफ शेख (वय 29 रा. शांतीनगर) आणि फैजान परवेज खान (वय 18 रा. हिंगणा) चा समावेश आहे.
अतिक आणि तनवीर यांच्यात जुने वैमनस्य होते. गेल्या 7 एप्रिलला गड्डीगोदाम परिसरात अतिकची तनवीरशी भेट झाली. त्याने आधी झालेल्या वादासाठी माफी मागितली आणि सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर दोघांनीही दारू प्यायली. काही वेळानंतर अतिकने त्याचा भाचा फैजान याला फोन करून तेथे बोलावले. तिघेही कारने भंडारा मार्गाने निघाले. अतिक आणि फैजानने आधीच त्याला मारण्याची योजना बनवलेली होती.
फुटेजमध्ये दिसली कार
भंडारा पोलिसांनी आयसीजेएस प्रणालीचा उपयोग करून राज्यभरातील बेपत्ता लोकांचा डाटा तपासला. मिळता-जुळत वर्णन आढळल्याने शांतीनगर पोलिस आणि तनवीरच्या कुटुंबाशी संपर्क करण्यात आला. तो लाखनीला कसा पोहोचला हे तपासण्यासाठी पोलिसांनी टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज तपासली. नागपूर पासिंगच्या वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. अतिकबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने फैजानसोबत मिळून खून केल्याचे कबूल केले. सध्या दोघेही भंडारा पोलिसांच्या ताब्यात आहेत.