मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला अन् काळाने घातला घाला
खापा : नागपूरच्या खापा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. वाकी डोहात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी एका अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. एक तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलाचे नाव दीप रवी छेवले (वय १५) आहे. तो नागपुरातील लालगंज परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप व मित्र नयन सुनील ठाकूर (वय १५), प्रणय परमेश्वर सोनकुसळे (वय २५), पियूष नारायण भुरे (वय २४, सर्व रा. लालगंज, इतवारी) हे सर्वजण पिपळा डाक बंगला येथे पीयूषच्या आत्याकडे आले होते. तेथून सर्वजण वाकी येथील दरबार दर्गाह येथे गेले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सर्व मित्र मौजमजेसाठी वाकी येथील डोहाकडे गेले. दरम्यान, दीप, नयन, पीयूष नदी पात्रात आंघोळीसाठी उतरले तर प्रणय हा बाहेर नदीकाठी होता. डोहात पोहत असताना दीपचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. इतर मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण वाचवू शकले नाही.
दरम्यान, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तिन्ही मित्र नागपूरला परतले. दीपच्या आईला घटनेची माहिती दिली. त्वरित दीपच्या नातेवाईकांनी खापा पोलिस स्टेशन गाठले. खापा पोलिसांनी त्यांना सांत्वना देत शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले. घटनेचा तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जगदीश पालीवाल, हवालदार प्रकाश नांदुरकर, पोलिस शिपाई नीलेश गावंडे, दशरथ पाटील यांनी केला. पुढील तपास खापा पोलिस करत आहे.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी
तत्काळ घटनेची माहिती वाकी पोलिस चौकी येथे दिली. वाकी पोलिस चौकीतून खापा पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय जगदीश पालीवाल हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण रात्र झाल्यामुळे मृतदेह शोधण्यात अपयश आले. घटनास्थळावर सकाळी ६ वाजता शोध मोहीम पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कालव्यात पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील बोरगाव येथे अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून कालव्यात पडून एका चिमुकल्याचा दुर्दवी अंत झालेला आहे. घरासमोरील म्हैसाळच्या कालव्यात पडून या चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रवण प्रशांत पाटील (वय २) असे या मृत मुलाचे नाव असून, त्याच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.२५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.






