शांतिदूत बनलेला पाकिस्तान आता बनू शकतो 'खलनायक'; ट्रम्प यांच्या अब्राहम करारामुळे शाहबाज अडकले पेचात' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका, इस्त्रायल या देशांतील संबंध चांगलेच ताणल्याचे दिसून येत आहे. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या देशांकडून हल्ले करण्यात आले होते. त्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले. मात्र, या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पाकिस्तान अशा पेचात सापडला आहे, जिथे सहमत होऊनही तो अडकेल आणि नकार दिल्यास आणखी मोठ्या संकटात सापडेल.
आठवड्याच्या अखेरीस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह अनेक देशांसोबत एक उच्चस्तरीय कॉन्फरन्स कॉल आयोजित केला होता. इराण युद्धानंतर ट्रम्प यांनी शक्य तितक्या मुस्लिम देशांना अब्राहम करारात सामील होण्याचे आवाहन केले, ज्याचा अर्थ मूलतः इस्रायलला औपचारिक मान्यता देणे असा होतो. वृत्तानुसार, या प्रस्तावानंतर कॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानसह इतर देशांना अजूनही तयार आहेत का? असा प्रश्न विचारला.
पाकिस्तानची कोंडी अशी आहे की, एकीकडे तो अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेचा दूत बनण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या प्रस्तावाने अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. जर पाकिस्तानने हा प्रस्ताव स्वीकारला, तर त्याला देशांतर्गत विरोध आणि आपल्या पारंपरिक परराष्ट्र धोरणाशी तडजोड करावी लागेल, तर नकार दिल्यास अमेरिकेसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच हा प्रस्ताव पाकिस्तानसमोर एक मोठे राजनैतिक आव्हान उभे करताना दिसत आहे.
पॅलेस्टाईनचा मुद्दा पाकिस्तानी जनतेसाठी भावनिक
पॅलेस्टाईनचा मुद्दा पाकिस्तानच्या लोकांसाठी नेहमीच अत्यंत भावनिक राहिला आहे. त्यामुळे, कोणतीही स्पष्टता नसताना इस्रायलला औपचारिक मान्यता देणे म्हणजे कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकणाऱ्या दारूगोळ्याच्या कोठारावर बसण्यासारखे आहे.
अब्राहाम करारात सामील होण्याचे आमंत्रण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणसोबतचा सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नात असताना, इस्रायलसोबतचे संबंध सामान्य करण्यासाठी त्यांनी कतारसोबतच सौदी अरेबिया, पाकिस्तान, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्की यांना अब्राहम करारात सामील होण्याचे आवाहन केले आहे.






