मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांचा पक्ष प्रवेश हा काही दिवसानंतर होणार होता. मात्र, भाजपने आजच त्यांच्या पक्ष प्रवेश करून घेतला आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. चव्हाण यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान भाजपचा दावा आहे की चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारही आज भाजपाच येण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्धीकी, मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तर, आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल केले जात आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सर्व आमदारांना फोन करत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
नाना पटोले काँग्रेसच्या सर्व आमदारांशी संपर्क साधत पक्षाची भूमिका स्पष्ट करत आहेत. तसंच, सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे. आमदारांसोबत थेट प्रत्यक्ष संवाद साधत काँग्रेस पक्षासोबत राहण्याच्या भूमिकेचे आवाहन करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. तर, काँग्रेसचे महत्त्वाचे नेत शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय.