15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये 'या' 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार
महत्त्वाचे म्हणजे, नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबईऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट मुंबई शहरात उतरता येणार आहे, ज्यामुळे वेळ आणि प्रवास दोन्हींची बचत होणार आहे.
या सेवांचे संचालन स्टार एअर (Star Air) ही कंपनी करणार असून, या विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहतील.
विशेषतः व्यावसायिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रातील प्रवासी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नांदेडहून यापूर्वी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळूरू आणि हैद्राबाद या पाच ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू होत्या. आता या नव्या दोन मार्गांमुळे नांदेडहून एकूण सात विमानसेवा सुरू राहणार आहेत.
आगामी टप्प्यात तिरुपती, शिर्डी आणि कोल्हापूर या धार्मिक व व्यावसायिक केंद्रांसाठीही विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे नांदेड हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे हवाई केंद्र (Air Connectivity Hub) म्हणून विकसित होणार आहे.
स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या दीर्घ प्रयत्नानंतर या विमानसेवा सुरू होत असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. नांदेडच्या आर्थिक आणि पर्यटनवाढीसाठी या सेवा “गेमचेंजर” ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.






