नांदेड वाघाळा महापालिकेवर अशोक चव्हाण यांच्या आवडीचा महिला महापौर होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेसाठी निवडणूक पार पडली. यानंतर महापौर पदासाठी चुरस रंगली आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये महिला राज असणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहराच्या राजकारणात नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
मुंबई येथे झालेल्या आरक्षण सोडतीत चिठ्ठी काढून हे आरक्षण निश्चित झाल्याने आता नांदेडमधून कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी व विरोधी गटांत हालचाली वाढल्या असून अंतर्गत बैठका, गटचचर्चा आणि दिल्ली-मुंबईपर्यंत राजकीय संदेशवहन सुरू झाले आहे. आजपर्यंत नांदेड महापालिकेचे महापौर पद सहा महिलांनी सांभाळलेले आहे. त्यामध्ये मंगलाताई निमकर, ए शमीम बेगम, शैलजा स्वामी, जयश्री पावडे शीला भवरे, मोहिनी येवनकर यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : 50 दिवसांपासून बेपत्ता झालेले मंत्र्यांचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण! महाड निवडणूक मारहाण प्रकरणात ट्वीस्ट
यावेळी देखील महापौर पदासाठी आरक्षण महिलांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक नगरसेविकांची नावे चर्चेमध्ये आहे. सध्या महापौरपदासाठी शैलजा स्वामी, जयश्री पावडे यांच्यासह ज्योती कल्याणकर, कविता मुळे, वैशाली देशमुख, –
कविता गड्डूम, सुलोचना काकडे, सुवर्णा बस्त्रदे, सुदर्शना खोमणे आणि अमृताबाई चजरंगसिंह ठाकुर अशी नावे चर्चेत आहेत. यापैकी ज्योती कल्याणकार, वैशाली मिलिंद देशमुख या नगरसेविकांची ही तिसरी टर्म असल्याने त्यांचा दांडगा अनुभव हा मोठा प्लस पॉइंट मानला जात आहे. प्रशासनाचा अभ्यास, सभागृहातील कामकाजाची जाण आणि पक्षांतर्गत समन्वय या बाबींमध्ये अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते,असे संकेत मिळत आहेत.
अशोक चव्हाण म्हणतील तीच महिला महापौर
खासदार अशोक चव्हाण हे कोणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेडमध्ये नव्या महिला चेहऱ्याला संधी देतात की नांदेड महानगरपालिकेची बिघडलेली घडी पूर्ववत आणण्यासाठी अनुभवी महिला चेहरा पुढे आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापौर निवडीत वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विशेषतः अशोकर चव्हाण यांच्या पसंतीला महत्व आहे. अशोक चव्हाण म्हणतील तीच महिला महापौरपदावर विराजमान होईल, असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्याचे तीव्र प्रयत्न सुरु झाले आहेत.
हे देखील वाचा : आज निष्ठा सहज विकल्या अन् तत्व फेकून दिली जातात…! बाळासाहेबांसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट
नांदेडसाठी काय बदल घडवू शकतात?
महिला महापौर सत्तेवर आल्यास प्रशासनात संवेदनशीलता वाढण्याची अपेक्षा आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला व
बालकल्याण, झोपडपट्टी सुधारणा, अंगणवाडी, शाळा सुविधा आणि महिला सुरक्षेसारख्या समस्यांना अधिक प्राधान्य मिळू शकते. स्वच्छता मोहिमा, महिला स्वयंरोजगार गटांना प्रोत्साहन, कौशल्य विकास, तसेच महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो. राजकीयदृष्ट्या पाहता, महिला नेतृत्वामुळे समन्वयाची भाषा, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक ठळक होण्याची शक्यता असते. विरोधकाशी टोकाचा संघर्ष टाळून विकासकेंद्री राजकारण पुढे नेण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नांदेडमध्ये महिलाराज” केवळ घोषणाचे न राहता, प्रत्यक्षात शहराच्या कारभारात सकारात्मक परिवर्तन घडेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.






