नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज (फोटो- istockphoto)
भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा
‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
नांदेड शहरात होणार मुख्य सोहळा
नांदेड: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-दी-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे.
२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार सूक्ष्म नियोजन
मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य व्यवस्थापन समिती गठीत करून वारंवार आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.
शासकीय-खाजगी आरोग्य यंत्रणांचा समन्वय
या नियोजनात जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांचा सहभाग आहे. यासोबतच नांदेड व परभणी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न असलेली खाजगी रुग्णालयेही आरोग्य सेवा देणार आहेत.
कार्यक्रमस्थळी अत्याधुनिक आरोग्य सुविधा
मुख्य कार्यक्रमस्थळी दोन स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उभारण्यात येणार असून, येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून पुढील सेवा दिल्या जाणार आहेत. असंसर्गजन्य आजारांची तपासणी, कर्करोग व दंतरोग तपासणी, महिलांच्या आजारांची विशेष तपासणी, मोफत वैद्यकीय सल्ला व औषधोपचार तसेच तातडीची संदर्भ सेवा व २४ तास रुग्णवाहिका सुविधा,नेत्र तपासणी, मोफत चष्मे व ज्येष्ठांसाठी सहाय्य, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फतही मोफत नेत्र तपासणी शिबिरे, गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप तसेच तपासणीनंतर गरजू ज्येष्ठ नागरिकांना काठ्यांचे वितरण केले जाणार आहे.
मार्ग, पार्किंग व निवासस्थळी वैद्यकीय पथके
भाविकांच्या सोयीसाठी नांदेड शहरातील प्रमुख प्रवेश मार्ग, वाहन पार्किंग क्षेत्रे, तसेच तात्पुरत्या निवासस्थळी वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे व रुग्णवाहिका सेवेत असणार येणार आहेत.






