पत्रकार परिषदेतच ठाकरेंनी बडगुजर यांचा विषय संपवला
Nashik Politics: गेल्या काही तासांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला. नाशिक जिल्ह्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. दोन दिवसांपू्र्वी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांची भाषा बदलली. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. इतकेच नव्हे तर, आपल्यासोबत आणखी १०-१२ जणही नाराज असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या वर्तणुकीतून ते भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण बडगुजर यांनी निर्णय घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी नाट्याच्या या खेळादरम्यान दोन दिवसापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नाशिकचा ठाकरे गटाच्या वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडींही सातत्याने सुरू होत्या. या सगळ्यात आज ( ४ जून) ठाकरे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी फोन करत बडगुजर यांची हकालपट्टी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर विद्यमान जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतही बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. आम्ही आदेश पाळतो, आम्ही पक्षप्रमुखांना प्रश्न विचारत नाही, असेही सुर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भारताच्या ‘या’ मित्राला खूश करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; शाहबाज यांनी पाठवला खास संदेश, जाणून घ्या
दरम्यान, बडगुजर यांच्या हकालपट्टीने पक्षात नाराज असलेल्यांना एक संदेश गेल्याचे बोलले जात आहे. पण नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांसह इतर नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, त्यामुळे आपण नाराज असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले होते.
दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेत्यांनी भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. डी.जी. सुर्यवंशी म्हणाले, “शिवसेना कधीच संपणार नाही. गिरीश महाजन यांची बडबड सुरूच आहे, पण जनतेला हे समजतेय की भाजपचा विस्तार शिवसेनेच्या खांद्यावरच झाला. तुमच्याकडे पालकमंत्री देण्याची ताकद नाही आणि वर म्हणता पक्ष संपवायला निघालोय? ही शिवसेना संपवणं कोणाच्याही हातात नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी दिला.
बैठकीला कोअर कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, याकडे लक्ष वेधत, “इथे कोणीही डबल रोलमध्ये नाही,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दत्ता गायकवाड म्हणाले, ‘ शिवसेनेत कुणाची नियुक्ती करायची त्याचे निर्णय उद्धव ठाकरे घेतात, आणि ते सामनातून जाहीर केले जाते. बडगुजर उपनेते झाले त्यावेळी कुणाला विचारले होते. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.