निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारात बिबट्याचा नियमित वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी ऊसतोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या या भागात ऊसतोडणी सुरु असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. रविवारी (दि.११) येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते. सकाळी आठच्या सुमारास मजूर ऊसतोडणी कामात व्यस्त असतांना ऊसाच्या दाट पाचटात बिबट्याचे दोन लहान बछडे दिसून आले.
अचानक बछडे समोर आल्याने ऊसतोड मजूरांची मोठी धावपळ उडाली. त्यांनी तातडीने ही माहिती शेतमालक अंबादास पाटील यांना दिली. त्यानंतर शेजारीच असलेल्या चंदू भास्कर पाटील यांच्याही शेतात ऊसतोडणीचे काम सुरू असतांना दुपारी दोनच्या दरम्यान दोन बछडे आढळले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल भटू बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोरख गांगोडे, बनमजूर शिरसाठ, गांगोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी ऊसतोडणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून, मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे बछडे साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचे असल्याचे वनरक्षक गोरख गांगोडे यांनी सांगितले.
सध्या रब्बी हंगामामुळे शेतशिवारात हिरवळ असून, बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत असल्याने तो कधी आणि कुठून हल्ला करेल याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. बिबट्याच्या भीतीने अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. बछडे आढळल्याने शेतमजुरांनी शेतात येण्यास नकार दिला असून, मादी बिबट्या परिसरातच असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
येथे बिबट्यांना लपवण्यासाठी जागा असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरीने शेतात काम करावे, पशुधन बंदिस्त गोठचात बांधावे, जनावरे गोठ्यात बांधावी, बाहेर लाईट लावावी, लहान बालके व वयोवृद्धांना एकटे घराबाहेर पडू देवू नये, रात्री बाहेर पड़तांना बॅटरीचा वापर करावा. विबटट्वाची हालचाल आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा, वनरक्षक दिंडोरी गोरख गांगोडे यांनी प्रतिक्रिया दिली.
मागील काळात निळवंडीत विबटवाने दोन शाळकरी मुलांचा जीव घेतला आहे.चार बछडे सापडल्याने शेतकरी व ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा, अशी प्रतिक्रिया शेतकरी निळवंडी अंबादास पाटील यांनी दिली.






