फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन
सिन्नर : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (रेशन दुकान) लाभार्थ्यांना ‘फोर्टिफाईड राईस’ अर्थात पोषक तत्त्वांनी समृद्ध तांदूळ वितरित केला जात आहे. मात्र काही ठिकाणी या तांदळाबाबत तो ‘प्लास्टिकचा तांदूळ’ असल्याचा गैरसमज पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा गैरसमज दूर करून नागरिकांमध्ये योग्य जनजागृती करण्यासाठी सिन्नरचे प्रभारी तहसीलदार पी. के. सिद्धार्थ राजकुमार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तहसील प्रशासनाकडून सर्व सरपंच, ग्रामसेवक तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना या तांदळाबाबत नागरिकांना योग्य माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभांमध्ये तसेच स्थानिक बैठकीत फोर्टिफाईड राईसचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगून तो प्लास्टिकचा नसून पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री नागरिकांना द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक रेशन दुकानात या संदर्भातील माहिती देणारे फलक लावण्याचेही सांगण्यात आले आहे. नेमका काय आहे ‘फोर्टिफाईड राईस’? सामान्य तांदळामध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्व बी-१२ यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे मिसळून तयार केलेले विशेष दाणे म्हणजे फोर्टिफाईड राईस कर्नल्स हे दाणे दिसायला अगदी सामान्य तांदळासारखेच असतात. हे दाणे ठरावीक प्रमाणात सामान्य तांदळात मिसळून लाभाथ्यर्थ्यांना वितरित केले जातात.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फोर्टिफाईड राईस शिजवताना तो स्वच्छ धुवावा; मात्र जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नये. तसेच तांदूळ शिजवलेले पाणी (पेज) फेकून देऊ नये, कारण त्यातही अनेक पोषक तत्त्वे असतात. कुपोषणमुक्त आणि सशक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबविला असून नागरिकांनी या तांदळाबाबतचे गैरसमज दूर करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
फोर्टिफाईड राईसचा नियमित आहारात समावेश केल्यास रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे रक्तक्षय (अॅनिमिया) होण्याचा धोका कमी होतो. गर्भवती महिला, लहान मुले तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यासाठी हा तांदूळ विशेष उपयुक्त ठरतो. शरीराची तसेच मेंदूची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे यात असल्याने कुपोषण कमी करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो.






