एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या शहरात काँग्रेसची अवस्था एकाकी झाली आहे. गेल्या निवडणूकीत सहा नगरसेवक काँगेस पक्षाकडून निवडून आले. त्यात प्रामुख्याने शाहू खैरे, वत्सला खैरे, राहूल दिवे, आशा तडवी, समीर कांबळे व डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले. मात्र पाच वर्षांची कारकिर्द पुर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मिळाली नसल्याचे कारण पुढे करीत डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला व तेथेही कामकाजाला कोणताही वाव नसल्याचे सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. तर समीर कांबळे यांनी काही महिन्यांपुर्वीच शिंदे गटात प्रवेश केला व दोन दिवसांपुर्वी राहूल दिवे, आशा तडवी यांनीही तीच वाट चोखाळली. कॉग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या खैरे परिवारातील शाहू खैरे यांनी गुरूवारी (25 डिसेंबर 2025) भाजपात प्रवेश करून आपली निष्ठा समर्पण केली आहे. आता एकमेव वत्सला खैरे याच पक्षात उरल्या आहेत. पक्षाच्या या अवस्थेला पक्षांतर्गत गटबाजीचे कारण दिले जात असले तरी, जिकडे सत्ता तिकडे निष्ठा वाहण्याच्या वाढत चाललेल्या प्रवृतीचे हे द्योतक असल्याचे पक्षाच्या निष्ठावंतांचे म्हणणे आहे.
महापालिकेत डॉ. शोभा बच्छाव या शेवटच्या कॉंग्रेसच्या महापौर म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणूकीतही काँग्रेसची अवस्था बिकट असून, पक्ष संघटनेच्या नावे चोंबाबोंब असतांना अवास्तव जागांची मागणी व त्यातून स्वबळाचे दिले जाणारे फुकाचे नारे पाहता, निवडणूकीत पुन्हा एकदा पक्षाच्या उरले सुरले अस्तित्व देखील पणाला लागणार आहे.






