सिद्धेश प्रधान : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाने जसा वेग घेतला, तसं विविध प्रकल्प विमानतळाच्या आसपासच्या परीसरात उभारण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या पुढील २० वर्षांचे या परिसराचे नियोजन शासनाने आखले आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, पर्यटनाच्या वाढीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.त्यात उलवे व खारघर हे दोन विभागांना अतीव महत्त्व प्राप्त झाले आहे. उलवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. तर खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिले जाणारे प्रकल्प उभे राहत आहेत.त्यात आता खारघरमध्ये संस्कृतिक संकुल सिडको उभारणार आहे. हे संस्कृतीक संकुल पॅरिसमधील ‘द लूव्र’, लंडनमधील ‘ब्रिटिश संग्रहालय’च्या धर्तीवर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील खारघरमध्ये यूरोपियन फील नागरिकांना अनुभवता येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यंदाच्या वर्षअखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टुजे वेगवान पाऊले उचलली जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे जातीने लक्ष देत आहेत. विमानतळाच्या आगमनामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण तालुक्याचे महत्व देशात वाढले आहे. महामुंबईचा महत्वाचा भाग असल्याने शेकडो कोटींचे प्रकल्प नवी मुंबईत येऊ घातले आहेत. त्यामुळे रोजगारासाठीचे महत्वाचे केंद्र नवी मुंबई बनू लागले आहे. तर देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर म्हणून नवी मुंबई उदयास येत आहे. हे सर्व पूर्ण करताना, पर्यटनाला देखील वाव मिळावा यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. एकीकडे खारघर येथे नैसर्गिक आकर्षण असलेला पांडव कडा असताना, सेंट्रल पार्क, इस्कॉन टेम्पल, जागतिक दर्जाचे गोल्फ कोर्स, फुर्बोल टर्फ सिडकोने उभारले आहेत. याशिवाय बीकेसी सारखे मोठे प्रोजेक्ट येऊ घातले आहेत.
नवी मुंबईतील खारघर विभाग हा मोठे लॅन्ड पार्सल म्हणून ओळखला जातो.त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विभागाला लागूनच असल्याने, विमानतळ सुरू झाल्यावर विदेशी पर्यटक उलवे तसेच खारघर भागात थांबण्याची शक्यता आहे. एकीकडे देशात पर्यटन वाढीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्व देत प्रत्येक राज्यातील पर्यटन वाढीसाठी कार्यक्रम आखले आहेत. अशात नवी मुंबई देखील देशाच्या व जगाच्या पटलावर आणण्यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या मदतीने कार्यक्रम आखले आहेत. यात खारघर विभाग अग्रभागी असणार आहे.
नवी मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत, सिडकोने क्रीडा, कला इत्यादी विविध सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. त्यातूनच सेंट्रल पार्क, आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स, फुटबॉल केंद्र उभारण्यात आले आहे. यासह भव्य असे इस्कॉन टेम्पल, पांडव कडा पर्यटकांना आकर्षित करत आहे. यासह अर्बन हाट, थिएटर इत्यादी विविध प्रकल्प येऊ घातले आहेत. आता यासोबत खारघरमधील उत्सव चौकाजवळ सुमारे २ हेक्टर क्षेत्रफळावर युरोपच्या धर्तीवर सांस्कृतिक संकुल उभारण्यात येणार आहे. त्यात ‘आर्ट गॅलरी, संग्रहालय आणि ‘सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ सारख्या सुविधांचा समावेश असणार आहे. हे संस्कृतीक संकुल पॅरिसमधील ‘द लूव्र’, लंडनमधील ‘ब्रिटिश संग्रहालय’च्या धर्तीवर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे हे संकुल नवी मुंबईच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणार आहे. या एकाच ठिकाणी पर्यटकांना विविध गोष्टी एकाच छताखाली अनुभवता, पाहता येणार आहेत. ज्यामुळे नवी मुंबई व खारघर विभाग जागतिक नकाशावर येणार आहे. यातून शासनाला महसूल प्राप्ती देखील होणार आहे.
पॅरिसमधील लूव्र हे जगातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध कला संग्रहालय आहे. लिओनार्डो दा विंचीची ‘मोना लिसा’, ‘व्हीनस डी मिलो’ आणि ‘सामोथ्रेसची नायकी’ यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जाते. हे संग्रहालय एका जुन्या शाही राजवाड्यात आहे. लंडनच्या ब्रिटिश म्युझियमची मुख्य खासियत म्हणजे मानवी इतिहास आणि संस्कृतीचे जतन करणारा जगातील सर्वात जुना आणि सर्वात प्रसिद्ध संग्रह आहे. ज्यामध्ये रोझेटा स्टोन, इजिप्शियन ममी आणि पार्थेनॉन शिल्पे यांसारख्या जगप्रसिद्ध वस्तूंचा समावेश आहे. हे संग्रहालय सुमारे ८ दशलक्ष वस्तूंनी व्यापलेले आहे.