नवी मुंबई : नवी मुंबईत नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. घणसोली ते ऐरोली सेक्टर 10 ए उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात यावी, बाधितांना योग्य मोबदला तात्काळ द्यावा, नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आज निर्देशने दिले आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेत बैठक घेतली. नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकी दरम्यान नवी मुंबई महापालिका व सिडको अधिकाऱ्यांकडून संयुक्त सादरीकरणही करण्यात आले आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये घणसोली ते ऐरोली सेक्टर 10 ए ला जोडणारा खाडीवर उड्डाणपुल (पाम बिच जोडणारा पूल) काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त वतीने उड्डणपुलाचे काम होणार आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे. मात्र काम कासवगतीने सुरु आहे. पूलासाठी आवश्यक परवानग्या वेळेत न घेतल्यामुळे प्रकल्प रखडला आहे. यावर ठाणे खासदार नरेश म्हस्के यांनी लवकरात लवकर सर्व परवानग्या घेऊन कामास गती देण्याचे निर्देश दिले. यासोबतच या भागातील शेतकरी, मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई पोटी योग्य तो मोबदला मिळेल याची हमी देखील आयुक्तांनी बैठकीत दिली.
ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या महत्वाकांक्षी रस्त्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. एनएमएमटी कर्मचारी अद्याप कायमसेवा न मिळाल्याने त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गंभीर आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यावरही ठामपणे भूमिका घेत, कायम करण्याआधी तातडीने वेतनवाढ द्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहे.
या बैठकीस ऐरोली विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला संघटिका शीतलताई कचरे, युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, बेलापूर शहरप्रमुख विजय माने, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तसेच महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, शहर अभियंता शिरीष अधरवाड आणि सिडको अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि दिलेले निर्देश हे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेस चालना देणारे ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.