या महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारमधील बड्या नेत्याने दिले संकेत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. मात्र आता राज्यात स्थिर सरकार आल्यामुळे या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र या निवडणुका आता आणखी ६ महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे.
सुनील तटकरे नक्की काय म्हणाले?
सुनील तटकरे म्हणाले, ‘नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी पक्षाला जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के संधी देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या “सशक्त संघटन” कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला हवं ते यश मिळालं नाही, याची कबुलीही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, अजित पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रात स्वीकारलं जाणार नाही, असं वातावरण तयार केलं गेलं. कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांबाबत एक विश्वास होता. लोकसभेत यश मिळालं नसलं तरी, विधानसभेत आपली ताकद दाखवली’ “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” आणि “लेक योजना” या योजनांवर विरोधकांनी टीका केली, पण अजित पवारांनी या योजनांना यशस्वी बनवल्याचं ते म्हणाले.
‘शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं’; आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलं?
‘सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तेव्हा आपण पक्ष म्हणून त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आगामी निवडणुकीत देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहे’, तसंच ‘प्रशासनावर आज अजित पवारांची पकड आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी जोमाने पुढे येऊन कामं करावे,’ असं आवाहन तटकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.