जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्य सरकारवर (State Govt) जहरी टीका केली आहे. जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी हे सरकार तीन रंगाचे आहे अशी टीका केली. तसेच हे सरकार म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका असा घणाघात देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला धारेवर धरत राज्यातील प्रश्न मांडले. खडसे म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती आहे. चोरी, दरोड्यांसह इतर गुन्हेदेखील वाढत आहेत. या सरकारमध्ये काय चाललंय? हे तीन रंगाचे हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका अशी आहे,” अशा शब्दांमध्ये एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे एकनाथ खडसे म्हणाले, “कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील सर्वांवर त्यांनी टीका केली.सरकारमधील बेरोजगारी कमी झाली. मात्र,राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढली,” असा टोला एकनाथ खडसे यांनी महायुतीला लगावला.