मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणीही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. ही सुनावणी गेल्या तीन दिवसांपासून सुरु असून, यावर अद्याप निर्णय आलेला नाही. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP MLA) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे.
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…
असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे..
सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या…— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2023
आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे…सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या…या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती..सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं..शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं…
ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?’
रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटचीच राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहे. मात्र, या ट्विटनंतर माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात वृत्त देण्यात आले आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले रोहित पवार?
माध्यमांनी आणि सामान्य माणसांनी माझ्या ट्विटचा अर्थ भूकंप असा घेतला आहे. जे प्राणी जंगलामध्ये राहतात, भूकंप येणार आहे. त्यांना हे आधीच कळतं. त्या अनुषंगाने मी बोललो होतो. सध्याचे सत्ताधारी आमदार आहेत. ते आधी वेगळे बोलायचे. परंतु, आता वेगळं बोलत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट बघावी लागते. एकाच पक्षाच्या फाईल क्लिअर होतात आणि फायली क्लिअर करण्याला गती आली आहे. ज्यावेळेस अस्थिरता असते त्यावेळेस अशी गती येते. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राजकीय भूकंप होईल का? असा प्रश्न मी उपस्थित केल्याचे रोहित पवार म्हणाले.