पुणे – एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतलेच दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत त्यांना ‘डिलीव्हरी बॉय’ची उपमा दिली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘तीन महिन्यांपूर्वीच आम्ही फटाके फोडले’ असं म्हणत ठाकरे सरकार पाडल्याच्या घटनेचा संदर्भ दिल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनाच शिंदे गट प्रमुख मानत असताना आणि भाजपाकडूनही एकनाथ शिंदेंचा उल्लेख सातत्याने त्याच संदर्भात केला जात असताना नेमक्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि पुण्याचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी लक्ष्य केलं आहे.
पुण्याचे माजी महापौर राहिलेले प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटर हँडलवरूर एकनाथ शिंदेंना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार फोडून भाजपाच्या गोटात सामील केल्याचा आरोप केला आहे. “अनेकांना वाटलं शिंदे साहेब लीडर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ते केवळ डिलीव्हरी बॉय निघाले. शिवसेनेतून आमदार भाजपामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम ते करतायत”, अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे.