सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. तर आणखी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी अखेरच्या क्षणी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवली. विशेष म्हणजे अर्ज माघारी घेताना झेंडे यांना राष्ट्रवादीकडून दिलेली उमेदवारी माघारी घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने पुरंदर तालुक्यातून तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. महायुतीमधील शिवसेना पक्षाला अधिकृत उमेदवारी असताना आयात उमेदवाराला सहकारी पक्षाकडून मिळालेली उमेदवारी म्हणजे विजय शिवतारे यांच्या पराभवासाठी अजित पवार यांच्याकडून मिळालेले पाठबळ आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी संभाजीराव झेंडे यांनी खूप प्रयत्न केले. विद्यमान आमदार संजय जगताप यांची उमेदवारी कायम ठेवत झेंडे यांची समजूत काढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र निवडणूक लढविणारच असा चंग बांधून झेंडे यांनी अपक्ष म्हणून तयारी सुरु केली. पहिल्या दिवसापासून अपक्ष म्हणून तयारी केली. त्याचबरोबर इतर पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महायुतीकडून शिवसेनेचे विजय शिवतारे यांना अधिकृत उमेदवारी असल्याने झेंडे यांचा निभाव लागणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. त्याच वेळी महायुतीमधून भाजपचे जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे, राष्ट्रवादीकडून दिगंबर दुर्गाडे, दत्तात्रय झुरंगे, गणेश जगताप यांनी अर्ज दाखल केल्याने विजय शिवतारे यांची डोकेदुखी वाढली. मात्र सर्वांवर मात करीत संभाजीराव झेंडे यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मिळवली.
संभाजी झेंडे यांना उमेदवारी मिळताच विजय शिवतारे यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली. तसेच झेंडे निवडणूक लढविण्यावर ठाम असले तरी पक्षाकडून दिलेली उमेदवारी माघारी घेतली जाईल, असे वाटत होते. परंतु त्यांनी अपक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाकडून भरलेले अर्ज माघारी घेतले आणि राष्ट्रवादीकडून भरलेला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. झेंडे यांना अजित पवार यांनी दिलेली उमेदवारी विजय शिवतारे यांच्यासह आमदार संजय जगताप यांची सुद्धा डोकेदुखी वाढविणारी आहे.
हे सुद्धा वाचा : सोलापूर शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदेंची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेसचा बाल्लेकिल्ला शाबूत ठेवण्याचे तगडे आव्हान
उमेदवारांची नावे अन् पक्ष
विजय शिवतारे (शिवसेना), संजय जगताप (महाविकास आघाडी), संभाजीराव झेंडे (राष्ट्रवादी कॉंंग्रेस), उत्तम कामठे (संभाजी ब्रिगेड), सुरज भोसले (बहुजन समाज पार्टी), उमेश जगताप (मनसे), संजय निगडे (राष्ट्रीय समाज पक्ष), कीर्ती माने (बहुजन वंचित आघाडी), सुरज घोरपडे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), उदयकुमार जगताप (अपक्ष), सुरेश वीर (अपक्ष), अतुल नागरे (अपक्ष), शेखर कदम (अपक्ष), विशाल पवार (अपक्ष), अनिल गायकवाड (अपक्ष), महादेव खेंगरे पाटील (अपक्ष).
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार
जालिंदर कामठे (अपक्ष), दिगंबर दुर्गाडे (अपक्ष), दत्तात्रय झुरंगे (अपक्ष), दिलीप गिरमे (अपक्ष), शंकरनाना हरपळे (अपक्ष), गंगाराम जगदाळे (अपक्ष) अभिजित जगताप (अपक्ष), संदीप मोडक (अपक्ष), आकाश जगताप (अपक्ष), गणेश जगताप (अपक्ष).