मुंबई : पाउस आणि मुंबईतील खड्डे हे एक समीकरणच होऊन गेले आहे. केवळ कोल्ड मिस्कचा वापर होत राहिला तर हे खड्डे कायमचे बुजतील असे अतिरिक्त आयुक्तांना देखील वाटत नाही. त्यामुळे पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेउन खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तात्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सततचा जोरदार पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे पुन्हा खड्डे होतात. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर वेलरासू यांनी रविवारी दिवसभर पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी भेटी देवून खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली.
पावसाळ्यात रस्त्यांवर उद्भवणारे खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने विभाग कार्यालयांच्या स्तरावर कार्यवाही केली जात आहे. कोल्ड मिक्स सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात आले तरी जोरदार पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे खड्ड्यांचा टिकाव लागत नाही आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये आणि खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळावी म्हणून लवकरात लवकर नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचणी करणे आवश्यक आहे, असे वेलरासू यांनी नमूद केले.
हायड्रोलिक प्रेस पद्धतीने तयार केलेले पेव्हर ब्लॉक्स हे तातडीने खड्ड्यात भरता येतात. जेणेकरुन वाहनांची वाहतूक लगेच सुरू करता येते. तसेच एम ६० ग्रेड मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये मोठ्या आकाराच्या लादी बनवून (प्रीकास्ट काँक्रिट प्लेट्स) वापरणे शक्य आहे किंवा कसे हे तपासावे. यामुळे खड्डे लवकर भरून वाहतूक लवकर सुरू होवू शकते. ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे एम ६० काँक्रिट वापरून खड्डा भरता येऊ शकेल व खड्डे भरणी मजबूत होईपर्यंत त्यावर पोलादी फळी (स्टील प्लेट) टाकावी जेणेकरून वाहतूक सुरळीत राहू शकेल याची देखील चाचपणी करण्यात यावी. अशा प्रकारची खड्डे भरणी किमान ३ ते ४ महिने टिकू शकते, त्यादृष्टीने देखील चाचपणी करावी, असेही वेलरासू सांगितले. फ्लाय ऍश अर्थात राखेपासून बनविलेल्या ब्लॉकचा देखील यामध्ये उपयोग करता येईल किंवा कसे, याचाही सांगोपांग विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
[read_also content=”शिवसेनेच्या सामाजिक कार्याने सामान्यांच्या विकासाला चालना : डॉ. नीलम गोऱ्हे https://www.navarashtra.com/maharashtra/promoting-the-development-of-the-common-people-with-the-social-work-of-shiv-sena-dr-neelam-gorhe-305233.html”]
दौऱ्याच्या प्रारंभी महालक्ष्मी परिसरातील केशवराव खाड्ये मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची,आर उत्तर विभागात दहिसर (पूर्व) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर रामकुंवर ठाकूर जंक्शन; आर मध्य विभागात बोरिवली (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर आर. एम. भट्टड जंक्शन; आर दक्षिण विभागात स्वामी विवेकानंद मार्ग – महात्मा गांधी मार्ग जंक्शन, लिंक रोड – महात्मा गांधी मार्ग जंक्शन, कांदिवली (पश्चिम) मधील लालजीपाडा जंक्शन; पी उत्तर विभागात मालाड (पश्चिम) मधील जुना लिंक रोड – मार्वे रोड जंक्शन आणि एस. व्ही. रोड – मार्वे रोड जंक्शन; पी दक्षिण विभागात गोरेगाव (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर बंडू गोरे चौक; के पश्चिम विभागात जोगेश्वरी (पश्चिम) मधील कॅप्टन सावंत मार्ग – स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन तसेच अंधेरी (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावर अंबोली जंक्शन; एच पश्चिम विभागात सांताक्रूझ (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहूतारा रोड जंक्शन या सर्व ठिकाणी पाहणी करून ज्या-ज्या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) द्वारे मेट्रो रेल्वे कामांसाठी रस्ते सुपूर्द केले आहेत, त्या ठिकाणी देखील खड्डे भरण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएकडे पाठपुरावा करावा, शक्य त्या सर्व ठिकाणी विभाग कार्यालयांच्या स्तरावर खड्डे बुजविण्याची कार्यवाही दिलेल्या मुदतीत करावी असे निर्देश वेलरासू यांनी दिले.