दोन्ही पलटूराम मोदी सरकार पाडणार; राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी अध्यक्ष कॅप्टन यादव यांचा दावा
राजकारणात नितीश कुमार हे पलटूराम म्हणून ओळखले जातात व आता त्यांच्या जोडीला चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या मोदी सरकारला आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षात हे दोघेही मोदी सरकार पाडतील, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांनी केला आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा अहमदनगर शहरात पार पडला. यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
हेदेखील वाचा- शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापितांच्या मागण्या मान्य; जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकललं
या मेळाव्यात बोलताना ओबीसी अध्यक्ष कॅप्टन यादव यांनी सांगितलं की, केंद्रातील मोदी सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न इंडिया आघाडी करीत नाही. मात्र या सरकारच्या नितीशकुमार व चंद्रबाबू या दोन कुबड्याच हे सरकार पाडेल. यामुळेच केंद्राच्या यंदाच्या बजेटमध्ये निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, झारखंड व हरियाणाला पैसे न देता केवळ नितीश कुमार व चंद्राबाबू यांना पैसे दिले आहेत. शिवाय मोदी स्वतःला देव मानतात. अहंकार त्यांच्यात आहे, 400 पार नारा संविधान बदलासाठीच दिला होता. त्यामुळे येत्या दोन वर्षात हे सरकार स्वतःच्याच वजनाने पडेल. मोदी सरकार पडल्यावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. मात्र मोदी तसे होऊ न देता नव्याने निवडणुका देशावर लादतील.
महाराष्ट्रमध्ये मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मागितलं आहे. यावर स्पष्ट भाष्य करण्यास यादव यांनी नकार दिला. महाराष्ट्रातील सरकारने याबाबतचा निर्णय घ्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत मध्यम मार्ग काढण्याबाबत सुचवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता याबाबत निर्णय घ्यावा. आरक्षण मर्यादा ५०% च्या पुढे देण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक आहे. जाती गणनाद्वारे प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती समजेल, असं यादव यांनी सांगितलं.
हेदेखील वाचा- शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला; 48 वर्षीय व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा
गरीब व श्रीमंत कोण हेही स्पष्ट होईल. त्यामुळे ज्याची जेवढी लोकसंख्या, तेवढे अधिकार त्यांना मिळतील. जाती गणना झाली नाही तर २०२६ मध्ये डीलिमिटेशन कसे करणार? आम्ही सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करणार, मागास वर्गातील महिलांना आरक्षण देणार, पंचायत राज व्यवस्थेत आरक्षण देणार, क्रिमिलेयरची मर्यादा १२ लाख करणार, उच्च शिक्षणातही आरक्षण देणार, असे यादव यांनी स्पष्ट केलं.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाची अहमदरनगरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली, मात्र ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आले असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे या बैठकीकडे फिरकले नाही. यासंदर्भात ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करतील, असे राष्ट्रीय अध्यक्ष यादव यांनी स्पष्ट केले. मात्र, जिल्हाध्यक्ष वाघ काही काळ बैठकीला आले होते व नंतर निघून गेले, असे ओबीसी राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी सांगितले.