नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर (फोटो- टीम नवराष्ट्र)
दापोली/समीर पिंपळकर: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीचा ठराव 16 विरुद्ध 1 असा मंजूर झाला आहे.नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात महा युतीच्या घटक पक्षांनी मतदान केल्याने अविश्वास ठराव 16 विरुद्ध 1 असा मंजूर झाला आहे. नगरपंचायतीमधील नगरसेवकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या सुधारित जीआर नुसार अर्ज केल्याने दोन मे रोजी रद्द झालेली विशेष सभा आज 5 मे रोजी पार पडली.
या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून विजय सूर्यवंशी यांनी काम पाहिले, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सहकार्य केले. दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांना पदावरून दूर करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाच्या सुधारित जी आर 15 एप्रिल 2025 चा आधार घेतला, ममता मोरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अविश्वास ठराव प्रलंबित असून,पुन्हा दुसरा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.
अविश्वास ठराव नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी मांडला तर या ठरावाला अनुमोदन नगरसेवक अन्वर रखंगे यांनी दिले. ठरावाच्या बाजूने 17 पैकी 16 नगर सेवकांनी हात उंचावून मतदान केले. नगरसेवक खालिद रखांगे , अन्वर रखांगे , आरिफ मेमन, मेहबूब तळघरकर , नौशिन गिलगिले, साधना बोत्रे ,कृपा घाग, रवींद्र क्षीरसागर, अजीम चिपळूणकर ,रिया सावंत, प्रीती शिर्के ,संतोष कलकुटके ,अश्विनी लांजेकर, शिवानी खानविलकर, जया साळवी, विलास शिगवण या नगरसेवकांनी मतदान केले.
ठरावाला विरोध म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका विद्यमान नगराध्यक्ष ममता मोरे यांनी ठरावाला विरोध केला. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातील नगरसेवकांनी वेगळा गट करून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यामुळे नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या होत्या. वेगळा गट केल्यानंतर नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली जोरदारपणे सुरू झाल्या होत्या. त्यातच सरकारने नवा जीआर काढल्याने त्या जीआरचा आधार घेत नगरसेवकांनी नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील आठ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने दापोली नगरपंचायतीमधील सत्तेचे समकरण बदलले आहेत. त्यामुळे ममता मोरे यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली दोन महिन्यापासून सुरू झाले आहेत. आज सोमवारी नगर अध्यक्ष ममता मोरे यांना पदावरून पायउतार करण्यासाठी नगरसेवकांनी जोरदार हालचाली सुरू केले आहेत . अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला जाणार असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अविश्वास ठरावाच्या विरोधात नगराध्यक्ष ममता मोरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ममता मोरे यांना दिलासा मिळतो की त्यांना पायउतार व्हावे लागेल पुढील निर्णय यावर अवलंबून आहे.