पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. चिंचवडच्या निकालाचा कल हा साधारण एक वाजता स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर कसबा पेठ विधानसभेच्या निकालाचा कल सकाळी अकराच्या सुमारास कळेल, असे सांगण्यात येत आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळणार का? चिंचवड मतदार वेगळा कौल देणार का? याचे उत्तर उद्या मिळणार आहे.
चिंचवडची मतमोजणी थेरगावात
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळ आठ वाजता थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहे. यासाठी प्रत्येकी चौदा टेबल, टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असेल. १८ पर्यवेक्षक, १८ सहाय्यक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली गेली.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएमवरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा ईव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
कोण मारणार बाजी?
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात काहीही करुन जागा राखण्यासाठी भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर विधानपरिषद निवडणुकीपाठोपाठ भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीनेही ही निवडणूक सर्वशक्तिनिशी लढली. तुलनेत मोठ्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाले आहे. इथे मतमोजणीच्या 37 फेऱ्या होतील, त्यामुळे अधिकृत अंतिम निकाल हाती येण्यास रात्रीचे 10 वाजण्याची शक्यता आहे.