नागपूर : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते सत्ताधारी भाजपमध्ये सामील होत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. राजकीय वर्तुळामध्ये अनेक नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा देखील समावेश झाला असून भाजपच्या बड्या नेत्याने याबाबत दावा केला आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते आशिष देशमुख यांनी धक्कादायक दावा केला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते वडेट्टीवारच भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. आशिष देशमुख म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे पहिले शिवसेनेत होते. नंतर वडेट्टीवार नारायण राणेंसोबत कॉंग्रेसमध्ये आले होते. परत कॉंग्रेसला सोडून ते अशोक चव्हाण यांच्यासोबत गेले. विजय वडेट्टीवार यांच्या कोलांट्या उड्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. आता नारायण राणे व अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आहेत. आम्हाला खात्री आहे की विजय वडेट्टीवार देखील भाजपच्या वाटेवर आहेत,” असा खात्रीशीर दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
पुढे आशिष देशमुख म्हणाले, “काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे विजय वडेट्टीवार बद्दल असलेली साशंकता आणि हायकमांड यांना बिलकुल थारा देत नाहीत. विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या स्वत:च्या विधानसभेमध्ये पराजय होण्याची भीती त्यांना आहे. नाना पटोले यांच्यासारख्या नेतृत्वात त्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर आहेत,” असे वक्तव्य भाजप नेतेच करत आहेत. यापूर्वी विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपची साथ धरली. त्यानंतर आता विद्यमान विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.