सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे होणाऱ्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला विरोध दर्शविणाऱ्या चार सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात पथ संचलन करण्यात आले.
इंदापूर शहरातील विरश्री मालोजीराजे भोसले गढी भोवती असणारे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नितेश राणे इंदापूरमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत. नितेश राणेंच्या समर्थकांनी यासंदर्भात दावा केला आहे.
परंतु, काही जातीवादी संघटनेची लोकं इंदापूर मध्ये येऊन इंदापूर मध्ये असणारा जातीय सलोखा बिघडवून त्यांच्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या मोर्चास परवानगी नाकारावी अशी मागणी सकल मराठा समाजाने पोलीस प्रशासनाकडे केली होती. परंतु, पोलीस प्रशासनाने सदरील मोर्चास परवानगी दिली आहे. मोर्चा रामवेस नाका येथून निघणार आहे. इंदापूर नगरपरिषद मैदानात सभा होणार आहे.
तसेच नितेश राणे यांच्याकडून जरांगे पाटलांविरोधात जी भूमिका घेतली जात आहे त्याला विरोध म्हणून नितेश राणे यांनी इंदापूर मध्ये येऊ नये, आम्ही त्यांना इंदापूरमध्ये येऊ देणार नाही. जर ते इंदापूर मध्ये आले तर त्यांची सभा आम्ही उधळून लावू असा इशारा नितेश राणे यांना सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये वातावरण तापले जाणार आहे.