पंढरपुरात भाजपच्या गडाला सुरुंग; प्रणिता भालेकेंचा दणदणीत विजय
महाविकास आघाडीचे स्थानिक आमदार असलेल्या अभिजीत पाटील यांनी प्रचाराच्या ऐनवेळी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्यामुळे एकाकी पडलेल्या भालके गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी नावाने स्थानिक आघाडी करत भाजप विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रणिता भालके यांनी भाजपाच्या शामल शिरसाट यांचा तब्बल 11,136 मतांनी पराभूत करत भाजपला धक्का दिला आहे. तर दुसरीकडे भाजपचे तब्बल 24, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 तर एक उमेदवार अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. एका अर्थाने भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेची चावी असणारे खरे पद म्हणजेच नगराध्यक्षपद मात्र भाजपाला गमवावे लागले आहे.
पंढरपूरमध्ये होत असलेल्या प्रस्तावित कोट्यवधी रुपयांच्याच्या कॉरिडॉर च्या निमित्ताने ही निवडणूक भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अनेक मातब्बर नेत्यांच्या सभा उपस्थिती नंतरही भाजपला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी कोणत्याही मोठ्या दिग्गज नेत्याच्या किंवा स्थानिक आमदारांच्या सहकार्य शिवाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करत आपला हा विजय मिळवला आहे.
पंढरपूर तसेच मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीतील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. या दोन्ही नगर परिषदा भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येतात. या ठिकाणी आजवर भाजप नेते परिचारक यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. तर मंगळवेढा नगरपरिषदेतही स्थानिक आमदार म्हणून भाजपचे विद्यमान विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांची मोठी ताकद असतानाही भाजपला नगराध्यक्षपदी पराभव स्वीकारावा लागला असल्याने हा भाजपसाठी मोठ्या चिंतनाचा विषय झाला आहे आजवर परिचारक गटाने पंढरपूर नगरपरिषद वर एक हाती वर्चस्व राखलेले आहे विरोधी गटाचे नगरसेवक निवडून येत असली तरी सत्ता मात्र भाजपकडे राहिलेले आहे मात्र यंदाच्या निवडणुकीने हा पॅटर्न बदलल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.






