संग्रहित फोटो
बीड : बीड जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विमानाने नांदेडला येतील. त्यानंतर, नांदेडहून पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर पोहोचतील. गोपीनाथ गडावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर परळी शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला निघतील. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
परळी शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे, त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत असल्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान उजणीच्या पाण्यासाठी अक्कलकोटसह दक्षिण सोलापूरमधील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू असून पंकजा मुंडे या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती होती. त्यामुळे भगवान गडावरील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीबाबत शंका होती.
दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या परळीत पोहचणार आहे. परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व नेतेमंडळी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी, सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ होणार असून, अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण देखील होणार आहे.