सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळ झालेल्या स्फोटानंतर पिंपरी-चिंचवडमधील पोलिस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी शहरभर ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली असून, प्रमुख चौक, मॉल्स, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
राज्य गृहमंत्रालयाकडून उच्च सतर्कतेचा इशारा मिळताच, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना तातडीने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरात २४ तास गस्त, तपासणी आणि देखरेख वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर आणि हिंजवडी या भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे.
संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष
महिला पोलिस अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकांकडून सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, बसथांबे आणि शॉपिंग मॉल्स परिसरात सतत नजर ठेवली जात आहे. संशयास्पद वाहनांची, विशेषतः मालवाहू आणि दुचाकी-चारचाकी वाहनांची कागदपत्रांसह तपासणी केली जात आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या सीमांवर पोलिस फौजफाटा तैनात असून, नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीद्वारे सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सर्व प्रमुख प्रवेशद्वारांवर विशेष तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
शहरातील संस्थांचीही सतर्कता वाढली
घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, शाळा आणि महाविद्यालयांनीही सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा तपासण्यात येत असून, स्थानिक सुरक्षारक्षकांना अतिरिक्त दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संशयास्पद व्यक्ती, वस्तू अथवा हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
सध्या शहरात कोणताही धोका नाही. मात्र दिल्लीतील घटनेनंतर खबरदारी म्हणून आम्ही शहरातील सुरक्षा वाढवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. — विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड






