जामखेड : जामखेड तालुक्यासाठी (Jamkhed Zilla Parishad) जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत गुरुवारी (दि.२८) जाहीर झाली असून, आरक्षण सोडतमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’, असे चित्र पाहायला मिळाले. इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकिटे मिळवण्यासाठी कामाला लागले असून, गावा-गावात राजकीय आखाडे तापायला सुरुवात झाली आहे.
जामखेडमधील तीनही जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्याने सर्वसाधारण इच्छुक हिरमुसले, तर ज्या कार्यकर्त्यांची लाँटरी लागणार आहे, त्यांचे चेहरे खुलले आहेत. त्यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांच्या नजरा आता पंचायत समितीच्या सर्वसाधारण जागेकडे वळल्याने ‘दुधावरची तहान ताकावर भागवायची’ असाच प्रकार सध्या होताना दिसत आहे.
दोन्ही आमदारांचा लागणार कस
पंचायत समितीचे साकत, आरणगाव, खर्डा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने नेमक्या कोणत्या कार्यकर्त्याला संधी द्यावी यासाठी दोन्ही आमदाराचा कस लागणार आहे. येणारी निवडणूक ‘किसमें कितना है दम’ हे दाखवून देण्याची संधी असल्याची चर्चा सध्या गावात होताना दिसत आहे.