पुढील तीन दिवस पावसाची शक्यता (फोटो सौजन्य :social media)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळ, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने मुंबईत शनिवारपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने 2025 च्या मान्सून संदर्भात महाराष्ट्रासाठी आशादायक अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी/तास वेगाने वारे होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात अधिक पावसाची शक्यता आहे. येत्या आठवड्यात मान्सून अरबी समुद्रात अंदमान-निकोबार बेटांवर यावर्षी एक आठवडा आधीच मान्सून दाखल झाला आहे. सध्या मान्सूनची वाटचालही योग्य आणि विनाअडथळा सुरू आहे. येत्या आठवड्यात मान्सून हिंदी महासागरातून अरबी समुद्रात येऊन धडकेल, असा अंदाज आहे.
प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना
गारपिटीचा इशारा असलेल्या भागासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. काढणी झालेली पिके निवाऱ्यात झाकून ठेवा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
पुणे शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग
पुणे शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची त्रेधातिरपीट उडल्याचे दिसून आले. पुण्याच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला. डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर आणि पेठ भागात पाऊस कोसळला.
पिंपरी-चिंचवडमध्येही पाऊस
गुरुवारी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. मात्र, गुरुवारी सकाळपासून वातावरण पावसाळी झाले होते. पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाने वाहतुकीवर देखील थोडासा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.