पुणे : हडपसर (Hadapsar) परिसरातील फुरसुंगीत लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर गुन्हे (Crime) शाखेच्या पथकाने छापा कारवाई केली. सामाजिक सुरक्षा विभागाने ही छापा कारवाई करत ५ महिलांची सुटका केली आहे. तर, एकावर गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी मारुती महादेव जाधव (वय ३०, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक मनिषा पुकाळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.
शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण, तरीही छुप्या पद्धतीने ते सुरूच असल्याचे दिसत आहे. दरम्यान फुरसुंगी रोडवरील हरपळे वस्ती येथे स्वर्ग लॉज आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजता येथे छापा टाकला. मारुती जाधव हा तेथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले. २३ ते ३५ वयोगटातील ५ महिलांना तेथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची सुटका करून त्यांना रेस्क्युहोममध्ये ठेवण्यात आले आहे.