Belhe Gram Panchayat Scam: बेल्हे ग्रामपंचायतीतील ३.१० लाखांच्या गैरव्यवहाराची चौकशी रखडली!
Belhe Gram Panchayat Scam: जुन्नर तालुक्यातील बेल्हे ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात चौकशी अहवाल अद्याप सादर न झाल्याने पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकारी,पंचायत समिती जुन्नर यांना स्मरणपत्र पाठवून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्मरणपत्रानुसार, १५ व्या वित्त आयोग सन २०२१-२२ अंतर्गत दत्तनगर ते कोबरवाडी रस्त्याचे काम प्रत्यक्षात न करता सुमारे ३ लाख १० हजार ६१२ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात तत्कालीन सरपंच,ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी संगनमत करून शासन निधीचा गैरवापर केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित सरपंचांवर ग्रामपंचायत कायद्यातील कलम ३९(१) अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात ग्रामस्थ विजय बाळासाहेब घोडके व इतरांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यानंतर जिल्हा परिषदे कडून गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, बराच कालावधी उलटूनही अहवाल प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला स्मरणपत्र काढावे लागले आहे.
तक्रारदार वारंवार पाठपुरावा करत असून प्रशासनाकडे अद्याप चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाही.त्यामुळे सदर प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करावा,असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),पुणे जिल्हा परिषद यांनी दिले असल्याचे स्मरणपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान,या प्रकरणात चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असून,बेल्हे ग्रामस्थांमध्येही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.






