पिंपरीत तब्बल 74 हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; 6.76 कोटींचा दंड केला वसूल (फोटो - सोशल मीडिया)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहनसंख्या, औद्योगिक क्षेत्रांमधील वर्दळ आणि महामार्गांवरील वाढलेली वाहतूक लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी मे महिन्यात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत अवघ्या एका महिन्यात तब्बल ७४६५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, सहा कोटी ७६ लाख ३०९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे आणि चिखलीसारखी मोठी औद्योगिक क्षेत्रे आहेत; तसेच शहरातून पाच महत्त्वाचे महामार्ग जात असल्याने दररोज लाखो वाहनांची ये-जा सुरू असते. शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमितपणे कारवाई केली जाते.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलिस आयुक्त सागर आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नंबर प्लेटमध्ये बदल, सिग्नल तोडणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट, राँग साइड, नो पार्किंगसह विविध नियमभंगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
कारवाईमध्ये सर्वाधिक नो पार्किंगच्या १९३४० कारवाया करण्यात आल्या. ११५८० टोइंग कारवाई करण्यात आल्या. ट्रिपल सीटच्या ६५३९ कारवाई करण्यात आल्या आहेत.
मे महिन्यातील कारवाईची आकडेवारी
• फॅन्सी नंबर प्लेट कारवाई : ५,४७५
• डेंजर ड्रायव्हिंग : २८४
• मोबाइलवर बोलणे : १९९३
• सिग्नल तोडणे – ८४८३
• ट्रिपल सीट – ६,५३९
• ड्रंक अँड ड्राइव्ह – ४०२
• जड-अवजड वाहन कारवाई – ८१४२
• काळी काच – ३०९०
• मॉडिफाइड सायलेन्सर – १०३२
• राँग साइड – २३९
• बस कारवाई – ३४९०
• रिक्षा कारवाई – ३१०२
• विना परवाना – ८७०
• टोइंग कारवाई – ११,५८०
• वाहतुकीस अडथळा/नो पार्किंग – १९,३४०
• लायसन्स निलंबन – १६६
• हेल्मेट कारवाई – ४२९
• एकूण कारवाई : ७४६५६
• एकूण दंड वसुली : सहा कोटी ७६ लाख ३० हजार ९००
वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळावी.
– विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.






