फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
Medical Officer Inspiring Story: देशसेवा ही केवळ एक उपजीविकेचे साधन नसते तर मनात रुजलेली अखंड साधना आणि उराशी बाळगलेला ध्यास असतो. पुण्याच्या युगंधर भोंडे यांनी या वाक्याचा जिवंत वस्तुपाठ देशासमोर ठेवला आहे. डॉ. युगंधरा भोंडे यांनी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (CAPF MOSB) अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. मसुरीत प्रशिक्षणानंतर त्या आता ‘असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर’ (क्लास वन ऑफिसर) या उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. ज्यावेळी त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. तेव्हा त्यांची मुलगी मीरा केवळ दीड वर्षांची होती.
डॉ. युगंधरा या मूळच्या नागपूरच्या असून दिवंगत प्रा. हरिदास आणि संध्या भोंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना देशसेवेचा वारसा हा घरातून मिळाला असून त्यांनी भारतीय सुरक्षा दलातील प्रतीक सोनारे यांच्यासह विवाह केला होता. पतीची देशसेवा आणि त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण हेच युगंधरा यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली आहे.
यूपीएससी(UPSC) उत्तीर्ण असणाऱ्या डॉ. युगंधरा यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीमधील ‘एम्स’ (AIIMS) मध्ये काही काळ काम केले होते. असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर या पदावर निवड झाल्यानंतर त्यांना मसुरीच्या आयटीबीपी अकॅडमीत सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.
मसुरीच्या जंगलातील थंडी आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यापेक्षाही एक आई म्हणून डॉ. युगंधरा यांच्यासमोर सर्वात मोठ आव्हान होत. ते म्हणजे आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्या लेकीपासून अनेक महिने दूर राहणे. एका आईसाठी आपल्या तान्ह्या बाळाला मागे सोडून देशसेवेचे व्रत घेणे हे कठोर तपश्चर्येपेक्षा कमी नव्हते. त्यांच्या या संघर्षाच्या काळात त्यांच्या सासरच्या कुटुंबीयांनी खंबीर साथ दिली. ज्यामुळे त्यांनी स्वत:ला य़शस्वीपणे सिद्ध करून दाखवले.






