डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेची मोठी इनकमिंग; भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
यावेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.
नुकतेच राज्य सरकारने पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर हा निर्णय झाल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी पिंपळेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचे अभिषेक व दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली.पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही सूचक वक्तव्य केले. शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत सकारात्मक संकेत देताना त्यांनी, सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याने याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो,असे म्हटले.
केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले राजकीय नशीब आजमावले होते. आता या सर्व नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असून येणाऱ्या काळासाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या विधान परिषदेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत खासदारांनी सकारात्मक संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे. यामुळे आगामी राजकीय रणनीती, जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समन्वय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे डोंबिवलीतील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे असून, पुढील काही दिवसांत इतर पक्षांमधूनही आणखी इनकमिंग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.






