सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. किशोर मासाळ यांनी केलेले वक्तव्य गंभीर असल्याने त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे व तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी दिला आहे.
नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत इंगळे व बांदल यांनी पक्षाची भूमिका भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून नगरसेवक मासाळ यांनी ‘दादां’ विषयीचे अत्यंत चुकीचे वक्तव्य करून बारामतीकरांसह राष्ट्रवादीच्या तसेच राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. ते वक्तव्य पुढे आल्यानंतर संबंधित नगरसेवकाचा राजीनामा झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यासाठी गेली दोन-तीन दिवस आम्ही संपर्क साधत होतो. शुक्रवारी मध्यस्थामार्फत भेट झाली. यावेळी पक्षाध्यक्ष म्हणून राजीनामा मागण्याची भूमिका त्यांना स्पष्ट केली. त्यावर विचार करण्यासाठी वेळ हवा असे संबंधितांनी सांगितले.
परंतु, आम्हाला त्यांना वेळ द्यायचा नव्हता. नगरसेवकाच्या राजीनाम्याबाबत काही तांत्रिक गोष्टी आहेत. पक्षाला कायदेशीर बंधन असतात. त्यामुळे मासाळ यांचे दादांवर खरंच प्रेम असेल, त्यांनी नशेत तसा प्रकार केला असेल तर राजीनामा देऊन भूमिका व्यक्त करावी, अशी आमची भूमिका होती. परंतु, तसे घडले नाही. अशा व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी जनसामान्यांची भावना आहे. त्यामुळे राजीनामा घेणं गरजेचे आहे. त्यानंतर पक्षात ठेवणं, हकालपट्टी हकालपट्टी. आदी कारवाया होतीलच. मात्र, पक्षाची भूमिका मांडण्यासाठी माध्यमांसमोर आल्याचे इंगळे आणि बांदल यांनी स्पष्ट केले.
बारामतीकरांच्या भावना तुम्हाला माहिती आहेत, अशावेळी पक्षाध्यक्ष म्हणून जे करणे अपेक्षित आहे, ते करा, अशा पक्षश्रेष्ठींच्या सूचना आल्या आहेत. पक्षाला विशिष्ट प्रक्रिया, कायदेशीर बंधन असतात. मासाळ यांनी राजीनामा न दिल्यास कायदेशीर आयुधांचा वापर पक्षाकडून आम्ही करू. हकालपट्टीचा पर्याय वापरू असेदेखील किरण इंगळे यांनी स्पष्ट केले. अजित दादा हे केवळ बारामतीची अस्मिता नसून संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे मासाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे इंगळे यांनी यावेळी सांगितले.






