सौजन्य - नवराष्ट्र टीम
भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या भागावर यंदा विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यादृष्टीने नवीन चेहरा तसेच तरुण पिढीला साथीला घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यातच निवडणुकीपूर्वी सुरेंद्र पठारे यांना भाजपात प्रवेश देऊन राष्ट्रवादीला मोठा झटका दिला होता. दुसरीकडे भाजपने सुरेंद्र पठारे यांच्यावर विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची संपूर्ण जबाबदारी सुरेंद्र पठारे यांच्याकडे सोपवली होती.
उच्च शिक्षित, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी देखील तळागाळापर्यंत पोहचत मतदारांचा विश्वास जिंकला. पूर्व पुण्याचा विकास मॉडेल सर्वांपर्यंत पोहोचवले. ज्या जिवावर सुरेंद्र यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी केवळ स्वीकारलीच नाही तर ती यशस्वीपणे पार पाडत पत्नी ऐश्वर्या पठारे यांचा आणि स्वतःचा संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणला. त्यामुळे पठारे कुटुंबाचा राजकारणातील प्रवेश केवळ औपचारिक न राहता तो प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, पूर्व पुण्यात भाजपची ताकद मर्यादित मानली जात असताना पठारे यांनी मिळवलेले यश हे पक्षासाठी मैलाचा दगड मानले जात आहे.
निकालामुळे केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेही भाजपच्या रणनीतीला नवे बळ मिळाले आहे. राजकारणात नव्याने आलेल्या सुरेंद्र पठारे यांनी पहिल्याच परीक्षेत चमकदार कामगिरी करत “पूर्व पुण्याचा नवा धुरंदर” अशी ओळख निर्माण केली असून, भविष्यातील राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार हे निश्चित मानले जात आहे.
पूर्व पुण्यातील मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेले नियोजन, तसेच तरुण आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेली संघटनात्मक बांधणी हे त्यांच्या विजयाचे प्रमुख सूत्र ठरले, असे सुरेंद्र पठारे यांनी विजयानंतर म्हंटले आहे.
शहराला नव्याने जोडला गेलेल्या गावांचा मिळून निर्माण झालेला 3 आणि 4 या प्रभागात सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदा 8 ही उमेदवार निवडून आणले आहेत.
हे सुद्धा वाचा : इचलकरंजीत काँग्रेसला मोठा धक्का; शहर अध्यक्षासह ‘हे’ बडे नेते पराभूत






