सोजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुणे शहरात कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिका आणि अपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या १५० खाटांच्या अत्याधुनिक कॅन्सर आणि हृदयविकार रुग्णालयाचे लोकार्पण येत्या रविवार (दि.१७) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
बाणेर येथे सुमारे १ एकर जागेत उभारण्यात आलेला हा १६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये पुणे महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित गुंतवणूक, व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी संबंधित संस्था म्हणजेच अपुलकी मेडिकल केअर सेंटर पार पाडणार आहे. हा देशातील कोणत्याही महानगरपालिकेचा पहिला पीपीपी मॉडेल कॅन्सर सेंटर असल्याचे विशेष नमूद केले जात आहे.
या रुग्णालयात सीजीएचएस दरांनुसार उपचार उपलब्ध असणार असल्याने सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कॅन्सर निदानापासून ते उपचारापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रात कॅन्सर पेशींवर अचूक उपचार करणारी अत्याधुनिक लिनियर अॅक्सेलेरेटर मशीन बसविण्यात आली आहे. ३५ कोटी रुपये किमतीची ही मशीन पुण्यातील केवळ काही मोजक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच पेट स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी, आधुनिक आॅपरेशन थिएटर आणि जनरल हॉस्पिटल सुविधाही उपलब्ध असतील.
४५ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेत
डॉ. प्रीतेश मुनोत यांच्या माहितीनुसार, या केंद्रात सुमारे ४० ते ४५ तज्ज्ञ डॉक्टर आणि सुमारे ४०० कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. कॅन्सर रुग्णांना विविध ठिकाणी फिरावे लागू नये म्हणून सर्व तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या प्रकल्पाला पुणे महापालिकेचा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. विशेषत: पुणे मनपा क्षेत्रातील रुग्णांना उपचारात प्राधान्य दिले जाणार असून, वेळ आणि खर्च दोन्हीमध्ये मोठी बचत होणार आहे. पुण्यातील आरोग्य सुविधांच्या इतिहासात हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरणार आहे’’ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका.






