संग्रहित फोटो
वैजापूर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील २३ वर्षीय विवाहितेला मनमाडला सोडण्याचे आमिष दाखवून दोन जणांनी सोबत नेले. त्यानंतर तिला मद्य पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे देवचंद अशोक भागवत (वय ३५, रा. गवंडगाव, ता. येवला, जि. नाशिक; सध्या रा. पाटील गल्ली, वैजापूर) आणि किरण अशोक पेटारे (वय ४०, रा. वाकला, ता. वैजापूर; सध्या रा. वानवाडी, वैजापूर) अशी आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती पतीसोबत मजुरीचे काम करते.
मनमाडला सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले
मनमाडला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना दोन्ही आरोपी तिच्याजवळ आले. त्यांनी मनमाडला सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ती त्यांच्या दुचाकीवर बसली. रस्त्यात पाऊस सुरू झाल्याने आरोपी तिला गवंडगाव येथील एका घरात घेऊन गेले. तेथे तिला मद्य पाजल्यानंतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतली दखल
घटनेनंतर पीडिता रडत असताना परिसरात आढळली. पोलिस कर्मचारी योगेश झाल्टे, अजित नाचन आणि दत्तात्रय रंधे यांनी तिची चौकशी करून तिला वैजापूर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना अल्पावधीत ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलिस करीत आहेत.
कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देखील देण्यात आली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






