GBS आजाराबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येने शतक ओलांडले असून १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान या आजाराबाबत एसओपी लवकरच सादर केली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी या आजाराबाबत आढावा घेतला आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथेही उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जीबीएस हा दुर्मिळ रोग आहे. मात्र बहुतेक रूग्ण बरे होत आहेत. हा संसर्गजन्य रोग नाही. पुण्यात जवळपास 101 रूग्ण आढळून आले आहेत. जवळपास यातील बरेचसे रूग्ण हे 5 ते 6 किमी परिसराच्या आतमधील आहेत. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेची मदत घेतली जात आहे. एक रूग्ण दगावला आहे. मात्र याच आजारामुळे त्याचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
सध्या इंग्लंड – भारत यांच्यात क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. यातील एक सामना 31 जानेवारीला पुण्यात होणार आहे. या सामन्याच्या वेळेस स्टेडियमवरील पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्यावे. जीबीएस हा विकार पिण्याचे पाणी दूषित असेल तर किंवा न शिजवलेले अन्न खालल्यामुळे होतो. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळावे. पाणी उकळून प्या. शासकीय रूग्णालयात उपचारांची विशेष व्यवस्था निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पुण्यात रुग्णांची शंभरी पार; मोहोळांनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
महत्वाचे तीन निर्णय झाले
पुण्यात जीबीएसचे वाढते रुग्ण पाहता महानगर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोमचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जातायत. अशातच पुणेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
हेही वाचा: Pune GBS Update: गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल
यामध्ये पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार, खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे, कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे , अशा या निर्णयांचा समावेश आहे. जीबीएसचे रुग्ण दाखल असलेल्या नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून किती बिल घेतलं जातंय, यावर हे मेडिकल ऑफिसर लक्ष ठेवणार आहे. रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले तर त्यांच्यावर कारवाई देखील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.