संग्रहित फोटो
बारामती : पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील माजी जिल्हाप्रमुख ॲड राजेंद्र काळे यांच्यासह बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठे खिंडार पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
माजी जिल्हाप्रमुख, माजी सहसंपर्कप्रमुख तथा पुणे जिल्हा संघटक राजेंद्र काळे यांच्या सहकार्याने आणि पुरंदरचे आमदार तथा माजी मंत्री विजय शिवतारे तसेच विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे, बारामती तालुकाप्रमुख निलेश मदने, दौंड तालुकाप्रमुख शंकर नाना शितोळे, भीमराव भोसले, महादेव सोमवंशी यांच्यासह तीनही तालुक्यांतील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर आणि आमदार विजय शिवतारे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढविण्यासाठी पक्ष नेतृत्व पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राजेंद्र काळे यांच्यासह तीनही तालुक्यांतील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, येत्या काही दिवसांत गावपातळीवरील अनेक पदाधिकारी, शिवसैनिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती राजेंद्र काळे यांनी दिली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये आगामी काळात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेली अनेक वर्षांपासून आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ होतो, त्यांच्या आदेशानुसार स्थानिक राजकारणात कधी पवारांच्या विरोधात तर कधी पवारांच्या बाजूने काम केले. मात्र आमच्या निष्ठेला न्याय मिळालेला नाही. कोणत्याही प्रकारची ताकद उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी आम्हाला दिलेली नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारची विचारणा केली जात नाही. आम्ही आमच्या ताकदवर नेहमी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, मात्र त्याची कोणतीही दखल वरिष्ठांनी न घेतल्यामुळे आम्ही शिवसेनेत (शिंदे गट) जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देतात. त्यामुळे पूर्ण ताकतीने आम्ही शिवसेनेचे काम सुरू करत आहोत. – ॲड राजेंद्र काळे.






