जानेवारीतच वाढल्या टॅंकरच्या फेऱ्या (फोटो - istockphoto)
पुणे: जानेवारी महिन्यातच पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे आकडेवारीतून समाेर आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यातच टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. खासगी टॅंकर व्यावसाियकांवर महापािलकेचे काेणतेही नियंत्रण नाही, परंतु महापालिकेच्या ठेकेदारी पद्धतीवरील टॅंकरवर तरी कर्मचाऱ्यांचा ‘वाॅच’ राहणार का ? याचे उत्तर पुढील काळात मिळेल.
महापालिकेच्या टँकर पॉइंटवरून जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविण्यात आले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात पुरविलेल्या टँकरच्या तुलनेत ही संख्या ७ हजार ११२ने जास्त आहे. ज्या भागात महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कार्यरत नाही, यंत्रणा असुनही अपुरा पाणी पुरवठा हाेताे अशा भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत. एका ठेकेदाराकडे कमीत कमी आठ टँकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे.
यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात महापालिकेने ३२ हजार ५८० टँकर पाणीपुरवठा केला होता. यंदा याच महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविले आहेत. फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडे अद्याप गेल्या पंधरा दिवसांतील टँकरची आकडेवारी उपलब्ध नाही. फेब्रुवारी महिना संपल्यानंतर आकडेवारी संकलित केली जाते, अशी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
हेही वाचा: Pune News: पुण्याला हक्काचे पाणी कधी मिळणार? महापालिकेची मागणी जलसंपदा विभाग ऐकणार? वाचा सविस्तर
दरम्यान, महापालिकेच्या टॅंकर ठेकेदारांकडुन केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा प्रत्येक टॅंकरवर बसविणे बंधनकारक आहे. या जीपीएस यंत्रणेची सुत्रे आता भरणा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे साेपविण्यात आली आहे . त्यांना दैंनदिन अहवाल सादर करावा लागणार आहे. यामुळे बाेगस फेऱ्या दाखवून बिले लाटण्याचा प्रकार कमी हाेईल असा दावा केला जात आहे.
खासगी टॅंकर व्यावसाियकांवर नियंत्रण नाही
महापालिकेने जानेवारीमध्ये ३५ हजार ५२७ टँकर पाणी मोफत, तर ४ हजार १६५ टँकर पाणी चलनाद्वारे पुरविले आहे. महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी पुरविले जाते. खासगी टँकरधारकांना महापालिकेकडून एका टँकरसाठी ६६६ रुपयांचा पास दिला जातो. ते पाणी त्या टँकरचालकाने किंवा मालकाने किती रुपयांना विकावे, यासंबंधी कसलेही बंधन नाही.
हेही वाचा: Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस
गेल्या तीन वर्षातील जानेवारी महिन्याची आकडेवारी
वर्ष – टँकर संख्या
२०२२-२३ – २८,५८०
२०२३-२४ – ३२,५८०
२०२४-२५ – ३९,६९२