
Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील काही भागात पाऊस बरसला. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांगलीच्या कडेगाव आणि तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
कोल्हापुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ
वातावरण पाहायला मिळाल होते. सातपुड्यातही पावसाने हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कोंडगाव आणि राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशीत पाऊस झाला. मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळ्या तालुक्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पाण्याअभावी रखडलेल्या रब्बी हंगामातील पिकांना या पावसाने आधार मिळाला असून, शाळू, ज्वारीच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
Malegaon Temperature : अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
दरम्यान, द्राक्ष बागांमधील रखडलेल्या फळछाटणीचाही मार्ग सुकर होण्याची आशा निर्माण झाली आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मालेगावात पारा ३८.२ अंशांवर
अश्विन महिन्यातच मालेगाव शहर व तालुक्यात चैत्रातील उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी (दि. ४) कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे ‘अश्विनात चैत्राचा दणका’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ऑक्टोबर हिटपासून सुटका मिळणार?
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढला असून, अश्विन महिन्यात चैत्रासारखी उष्णता जाणवू लागली आहे. शहरात कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, मालेगावचे तापमानही ३५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनने माधार घेतल्याने हवेतील आर्द्रता कमी झाली असून आकाश निरभ्र राहिल्याने सूर्यकिरणांचा बेट परिणाम जमिनीवर होत आहे.