पुणे, इंदापूर, बारामतीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा; (संग्रहित फोटो)
नीरा : राज्यात अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. असे असताना निरा नदी प्रणालीतील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यामुळे पुणे, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि फलटण परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण निरा नदी प्रणालीत सध्या सुमारे २०.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये विशेषतः वीर धरणाचा साठा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात असून, सध्या धरणात ५२२५ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ५.६८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
निरा नदी खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये भाटघर, देवघर, गुंजवणी आणि वीर धरणांचा समावेश होतो. यापैकी वीर धरणाची एकूण क्षमता ९८३५ दशलक्ष घनफूट असून, त्यातील उपलब्ध साठा उन्हाळ्याच्या अखेरीसही समाधानकारक मानला जात आहे. अहवालानुसार, वीर धरणातील पाणीसाठा सध्या सुमारे ५१ टक्क्यांच्या आसपास आहे. मागील वर्षी म्हणजे २६ मे २०२५ रोजी वीर धरणात सुमारे ३३७५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. तर यंदा हा साठा वाढून ५२२५ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वीर धरणात सुमारे १८५० दशलक्ष घनफूट अधिक पाणी उपलब्ध आहे. टक्केवारीत पाहिले तर यंदाची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारलेली दिसत आहे.
यामुळे आगामी काही आठवडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. विशेषतः बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील शेती व नागरी पाणीपुरवठ्यासाठी वीर धरण महत्त्वाचा आधार मानला जातो.
सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापर
अहवालानुसार, यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात निरा डावा व उजवा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आवर्तनानुसार निरा प्रणालीतील दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरू आहे. निरा डावा कालव्याद्वारे विविध टप्प्यांमध्ये पाणी सोडण्यात आले असून, १५ ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निरा उजवा कालव्याद्वारेही रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
निरा डावा कालवा ; सुमारे ८२७ क्युसेक विसर्ग
सुमारे १५५० क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे. वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बारामती, इंदापूर, माळशिरस, पुरंदर, फलटणसह अनेक भागातील शेतीसाठी जीवनरेखा मानले जाते. ऊस, डाळिंब, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी सध्या सिंचन सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.






