पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार (फोटो- सोशल मीडिया)
पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार
शार्प शूटर पथकाने झाडल्या गोळ्या
ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा
पारगाव शिंगवे / शिक्रापूर: पिंपरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या नरभक्षक बिबट्या अखेर ठार करण्यात आला. पारगाव शिंगवे व पिंपरखेड परिसरात नागरिकांवर हल्ले करणाऱ्या या बिबट्याला मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री साडेदहाच वाजताच्या सुमारास शार्प शूटर पथकाने गोळ्या झाडून ठार केले. या नरभक्षक बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे वनविभागाने सांगितले. या घटनेनंतर परिसरात मोठा दिलासा व्यक्त करण्यात आला असून मृत बिबट्याचे शव ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे नेण्यात आले.
पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन आणि माणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप होत होते. भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांनी जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड परिसरात रास्तारोको आणि आंदोलन करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. “या परिसरात आता बिबटे नकोत,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली होती.
वनविभागाची तातडीची मोहीम
या नरभक्षक बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पुणे जिल्हा वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली. त्यांनतर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्थेचे पशु चिकीत्सक डॉ. सात्विक पाठक, शार्प शूटर जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू केली होती.
भ्रमणमार्गाचे निरीक्षण व थर्मल ड्रोनचा वापर
बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. दिवसभर ठशांचे निरीक्षण केल्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. संध्याकाळी घटनास्थळापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट्या दिसून आला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला; मात्र तो निष्फळ ठरला. यानंतर बिबट्या आक्रमक होऊन प्रति-हल्ला करत असताना शार्प शूटरने गोळी झाडली आणि रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या ठार झाला.
Pune News: “जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे…”;काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?
यशस्वी मोहिमेमागे वनविभागाचे सहकार्य
ही मोहीम वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस. अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, तसेच रेस्क्यू संस्थेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वी झाली.






