कोण होणार पुण्याचे पालकमंत्री? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
पुणे: राज्यात महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळ स्थापन झाले. दरम्यान आता कोणला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पुण्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शर्यत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता याबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे भाष्य केले आहे.
पुण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवारच असतील, असा दावा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत पुढील काळात नाराजीनाट्य पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याच्या पार्श्वभुमीवर भरणे यांचे वक्तव्य महत्वाचे ठरले आहे.
कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्य दिनानिमित्त दत्तात्रय भरणे आले होते. यावेळी त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन खातेवाटप देखील झाले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. पालकमंत्रीपदासाठी प्रत्येक पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच (अजित पवार गट) नेते दत्तात्रय भरणे यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही रस्सीखेच सुरू नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणत असले तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती?
५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालय स्वत:कडे ठेवले आहे. तसेच गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि खातेवाटप न झालेली इतर खाती त्यांच्यकडे आहेत. एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आले आहे. अजित पवार यांना अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले आहे.
हेही वाचा: मोठी बातमी; राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती? वाचा संपूर्ण यादी
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार