रोहित पवारांची सरकारवर टीका (फोटो- सोशल मीडिया)
शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकारचे दुर्लक्ष
काही पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत – रोहित पवार
महाराष्ट्रात दररोज खून, बलात्कार आणि गुंडगिरीच्या घटना
पुणे: “महाराष्ट्रात दररोज खून, बलात्कार आणि गुंडगिरीच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, सरकारला भाजपच्या ट्रोलरना पुढे करून आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास वेळ आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी चुकीची कलमे लावून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तुम्हाला कितीही गुन्हे दाखल करायचे असतील ते करा, पण आम्ही घाबरणार नाही आणि सरकारविरुद्ध बोलतच राहू,” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघात आधारकार्डचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत प्रात्यक्षिक दाखविले होते. त्यानंतर गृहविभागाने त्यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर गुरुवारी पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
“अंधश्रद्धेविरुद्ध एखादे प्रात्यक्षिक दाखवून त्यातील खोटेपणा उघड करतो, त्याप्रमाणे मी आधारकार्डचा गैरवापर दाखविला. मात्र, त्या प्रकाराची दखल घेण्याऐवजी माझ्याविरुद्धच गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणात तपास गृहविभागाने केला असला तरी फिर्यादी मात्र भाजपच्या सोशल मीडियावरील कार्यकर्ता आहे,” असे पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध फसवणूक, जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे, भीती पसरविणे, अपहरण यांसारख्या कलमानुसार गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात हे गुन्हे आमच्याच विरोधात दाखल केले जात आहेत.” पवार यांनी सरकारवर अन्य प्रकरणांत कारवाईत झालेल्या विलंबावरूनही टीका केली. “नवी मुंबईतील भ्रष्टाचार प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी हत्या, संतोष देशमुख खून अशा घटनांनंतरही तत्काळ गुन्हे दाखल झाले नाहीत. मात्र, माझ्या प्रकरणात सरकारने तत्काळ कारवाई केली. मी पोलिसांच्या विरोधात नाही, परंतु काही पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत,” असे पवार म्हणाले.
पवार यांनी पुढे सांगितले की, “मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आणि अध्यक्ष आहे. मुंबई क्रिकेट संघटनेतील कारभाराशी माझा काहीही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस हे ‘क्लिनचीट मुख्यमंत्री’ आहेत. ते शब्दांचा खेळ करणारे व्यक्ती आहेत. व्हीएसआय संस्थेच्या प्रतिमेला ऑडिटच्या नावाखाली धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भविष्यात त्यांच्या मूळ पक्षाशिवाय गत्यंतर राहणार नाही,” असे पवार यांनी नमूद केले.
पवार, शिंदे स्वगृही परततील
ज्यांना राजकारण कळते, त्यांना हे माहीत आहे, की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात भाजपला कुणाच्या कुबड्याची गरज नाही, असे म्हणतात. याचा अर्थ अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला राहिलेली नाही. त्यामुळे २०२९ पूर्वी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही, ते स्वगृही परततील, असे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले.






