सौजन्य - नवराष्ट्र टीम
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये आज अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. उन्हाळ कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने रंग बदलल्याने, शेतात साठवून ठेवलेला ‘लाल सोन्याचा’ ढीग (आरणी) प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओतूर, रोहोकडी, डिंगोरे, आंबेगव्हान, पाचघर, उंब्रज, खामुंडी आणि उदापूर परिसरात तापमानाचा पारा वाढलेला होता. मात्र, आज दुपारपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे काढणी करून शेतातच साठवून ठेवलेला कांदा भिजण्याची भीती निर्माण झाली आहे. कांदा जर पावसात भिजला, तर त्याला मोड येणे किंवा सड लागणे असे प्रकार घडतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. ढगाळ वातावरण पाहताच शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेताकडे धाव घेतली. घरातील अबालवृद्धांनी एकत्र येऊन कांद्याच्या आरणीवर प्लास्टिक कागद टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
अचानक मागणी वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत प्लास्टिक कागद मिळवण्यासाठीही शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा सुटल्याने प्लास्टिक कागद आरणीवर टिकवून ठेवणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे. अनेक ठिकाणी दगडांच्या आणि दोरीच्या सहाय्याने हे कागद बांधून ठेवले जात आहेत. यावर्षी कांद्याला मिळणारा भाव आणि निसर्गाची साथ यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. महागडी बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च करून पिकवलेला कांदा आता सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
”वर्षभर मुलाप्रमाणे कांदा जपला, आता कुठे पीक हाती आले होते. पण या ढगाळ वातावरणामुळे काळजात धडधड वाढली आहे. जर पाऊस झाला, तर आमचे आर्थिक कंबरडे मोडेल,” अशी भावना ओतूर येथील कांदा उत्पादक शेतकरी शंकर हाडवळे या शेतकऱ्याने बोलताना व्यक्त केली.
हवामान विभागाने येत्या २४ ते ४८ तासांत राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचाच प्रत्यय ओतूर परिसरात येत असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाची चिन्हे दिसत आहेत. यामुळे केवळ कांदाच नव्हे, तर शेतात काढून ठेवलेल्या इतर पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.






