 
        
        विमानतळ परिसरात सर्वेक्षण सुरु (फोटो - istockphoto)
पुणे: पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये रियलइस्टेट मार्केट चांगलेच तेजीत आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत काही दलाल आणि विकासकांनी विनापरवाना प्लॉटिंगचा धंदा सुरू केला आहे. या बेकायदेशीर प्रकारावर आता पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) धडक कारवाई सुरू केली आहे.
विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते काढून शेतजमिनींचे तुकडे केले जात असून, प्लॉटिंगसाठी आवश्यक परवानग्यांची कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या व्यवहारांमुळे भविष्यात खरेदीदारांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.
पीएमआरडीएचे सर्वेक्षण
पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गेल्या दोन दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील सुमारे १५ गावांत सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. या गावांमध्ये आंबोडी, चिव्हेवाडी, देवडी, दिवे, गुऱ्होली, जाधववाडी, काळेवाडी, केतकावळे, कुंभारवळण, पवारवाडी, सिंगापूर, सोनोरी, उदाचीवाडी, वनपुरी आणि झेंडेवाडी यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात अनधिकृत बांधकामे, रस्ते, सीमारेषा व विक्रीसाठी तयार केलेले प्लॉट यांची तपासणी करण्यात येत आहे. जेथे नियमबाह्य प्लॉटिंग आढळेल, त्या ठिकाणांवर पीएमआरडीएकडून नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव
पीएमआरडीएचा इशारा
पीएमआरडीएने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, विनापरवाना प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक करू नका.
जमीन खरेदी करण्यापूर्वी संबंधित मालमत्तेला विकास परवाना आहे की नाही, हे खात्रीने तपासा.
अनधिकृत प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात बांधकाम परवानग्या, नोंदणी आणि कायदेशीर कारवाईच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असाही इशारा पीएमआरडीएने दिला आहे.
सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतर संबंधित अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. काही ठिकाणी रस्ते बुजविणे, प्लॉटची सीमारेषा हटविणे आणि नोटिसा जारी करणे यासारखी कारवाई अपेक्षित आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे की, ʻनियम मोडणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.






